
जळगाव ते पालदरम्यान होणार जागृती
जळगाव (प्रतिनिधी) : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव आणि यावल वनविभाग यांच्यावतीने सोमवारी सकाळी जळगाव ते पालपर्यंत अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे दोन दिवस व्याघ्र संवर्धन जनजागृती करण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या रॅलीला आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, भरतदादा अमळकर, राजेंद्र नन्नावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हिरवी झेंडी दाखवण्यात आली.
सहभागी विद्यार्थी व्याघ्र दूतांना जंगल सफारी
या जनजागृती कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून १०० व्याघ्र दूत आणि यंदा प्रथमच विवेकानंद प्रतिष्ठानचे २५ शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावल वनविभागातर्फे सहभागी विद्यार्थी व्याघ्र दूतांना जंगल सफारी घडवली जाणार असल्याने त्यांच्यात अभूतपूर्व उत्साह दिसून आला. व्याघ्र दूतांचा उत्साह वाढवण्यासाठी वन्यजीव प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन दिवस होणार जनजागृती
‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’ हा संदेश देत पथनाट्य सादर करत ही रॅली जळगाव, नशिराबाद, भुसावळ, सावदा, फैजपूर मार्गे पाल असा दोन दिवसांचा जनजागृती प्रवास करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण देवरे आणि अध्यक्ष रवींद्र फालक यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक जमीर शेख हे होते. उपाध्यक्ष मुकेश सोनार आणि सतीश कांबळे यांनी संस्थेची भूमिका विषद केली. सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे यांनी तर आभार यावल वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी मानले.
दोन मानवी वाघ ठरले आकर्षण
पाल येथे यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या हस्ते जनजागृती कार्यक्रमास २९ जुलै रोजी सुरुवात होणार आहे. यशस्वीतेसाठी, यावल वनविभाग जळगावचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील तसेच वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, उपाध्यक्ष सतीश कांबळे, मुकेश सोनार आणि इतर अनेक सदस्य परिश्रम घेत आहेत. या जनजागृती कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील आणि राज्यांतील संस्था व व्याघ्र दूत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, जंगलाच्या धर्तीवर सजवलेल्या सफारी वाहनावर उभे असलेले दोन मानवी वाघ सर्वांचे आकर्षण ठरले आहेत.