अभिवादनआंदोलनआरोग्यऐतिहासिककलाकारजळगावताज्या बातम्याधार्मिकनिवडपुरस्कारमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यसामाजिक

स्थानिक संसाधने, लोकसहभागातून शाश्वत विकास शक्य – चैत्राम पवार

जळगाव (प्रतिनिधी : स्थानिक संसाधनांचा वापर करून लोकसहभागातून शाश्वत विकास शक्य असल्याचे पद्मश्री पुरस्कार विजेते चैत्राम पवार यांनी प्रतिपादन केले. रोटरी क्लब जळगाव आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यामाने मायादेवी नगरातील रोटरी भवन मध्ये आयोजित बदलाचं बीज बारीपाड्यापासून भारतापर्यंत या विषयावरील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

व्यासपीठावर रोटरी जळगावचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष जितेंद्र बरडे, मानद सचिव ॲड. केतन ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती. जल, जंगल, जमीन, जन आणि पशुधन हे पाच बिंदू मानून आम्ही शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले. १९९०-९१ मध्ये डॉ. आनंद फाटक यांची झालेली भेट या कामासाठी दिशादर्शक ठरली. गावाने संघटित होऊन मोहाच्या झाडांची व्यावसायिक योजना, वनसंवर्धन, जलसंवर्धन, वन-धन -विकास योजना अशा विविध माध्यमातून अथक परिश्रम केले असे चैत्राम पवार यांनी मुलाखतीत प्रारंभी सांगितले.

आम्ही कुऱ्हाड बंदीतून ११०० एकर जंगल वाचविले आहे. त्याची किंमत आज ३ हजार कोटीपेक्षा जास्त आहे. लाकूड बंदी करण्यापूर्वी आयआयटी पवई यांच्या मदतीने सोलर कुकर व नंतर स्मोक लेस चुल्हा यामुळे महिलांना स्वयंपाकासाठी पर्याय उपलब्ध झाला असेही ते म्हणाले. अस्तित्व आणि अस्मिता सांभाळून क्लस्टर, योजक या माध्यमातून आम्ही विकासाकडे वाटचाल करीत असून सुरू असलेल्या कामात पारदर्शकता ठेवल्यामुळे या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे असे पवार म्हणाले.

एअर फोर्स, कृषी विभाग आणि जळगाव जनता बँक या ठिकाणी नोकरीची संधी असताना देखील गावाचा विचार व नव्या पिढीचे भविष्य विचारात घेता समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूर्णवेळ नाही पण जास्तीत जास्त वेळ कुटुंब सांभाळून या कार्यासाठी देत असल्याचेही त्यांनी सांगितले. कबड्डी स्पर्धा, दिवाळी सुट्टीतील वनभोजन – श्रमदान, महिला बचत गटाचे माध्यमातून आरोग्य जतन, वनभाज्या स्पर्धा या विविध विषयातील उदाहरणांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बारीपाडा येथे दिलेल्या भेटी प्रसंगी केलेल्या आवाहनानुसार आम्ही कामाचा विस्तार करीत ४४ गावांचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहोत. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे आमच्या कार्यासाठी मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे असे चैत्राम पवार म्हणाले. रोटरी आणि वनवासी कल्याण आश्रम एकत्र येऊन कार्य केल्यास एक वेगळी दिशा मिळून मोठे काम उभे राहू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भोजनाची थाळी शुद्ध असल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही आणि सुखी जीवनासाठी शांत झोप आली पाहिजे असे सांगून बदल घडवायचा असेल तर त्यासाठी संरक्षण, संवर्धन, पुनर्निर्माण या आधारावर कार्यात सातत्य असले पाहिजे असे त्यांनी शेवटी सांगितले.

पद्मश्री हा खानदेशचा सन्मान
चैत्राम पवार यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल रोटरी जळगाव परिवाराच्यावतीने त्यांना डॉ. अपर्णा भट -कासार, डॉ. नरेंद्र जैन, जितेंद्र ढाके, सी.ए.अनिलकुमार शाह यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आपल्या भावना व्यक्त करताना चैत्राम पवार यांनी हा पद्मश्रीचा सन्मान माझा किंवा बारीपाड्याचा नसून संपूर्ण खानदेशचा आहे असे सांगितले.

मुलाखतीचे संचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप जोशी यांनी तर परिचय डॉ. अपर्णा भट- कासार यांनी करून दिला. सन्मानपत्राचे वाचन आदिती कुलकर्णी यांनी केले. आभार जितेंद्र बरडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button