जळगावच्या ७,३१६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा; दुसरी यादी जाहीर, आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; ५,३९९ शेतकरी जिल्हा बँकेचे, १,९१७ राष्ट्रीयीकृत बँकांशी संबंधित
जळगाव (प्रतिनिधी: शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील ७,३१६ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या यादीत ५,३९९ शेतकरी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित आहेत. तर १,९१७ शेतकरी विविध राष्ट्रीयीकृत बँकांशी संबंधित असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या यादीची भर
योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील ३१,९०८ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या यादीत आणखी ७,३१६ शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील ८७,८२६ कर्जखात्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६५,३४३ खाती पात्र ठरली आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना पुढील टप्प्यांत लाभ दिला जाणार असल्याचे वृत्त आहे.
आधार प्रमाणीकरण महत्त्वाचे
यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कार्यकारी सहकारी संस्था किंवा बँकेच्या शाखेत यादीची खात्री करून घ्यावी. त्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणात विलंब झाल्यास लाभ वितरणाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



