
पंढरपूर आषाढी वारीसाठी सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव
रावेर (प्रतिनिधी): आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालक व वाहकांचा रमजीपूर येथे विशेष सत्कार करण्यात आला.
समाजसेवक डॉ. संदीप पाटील आणि डॉ. योगिता पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात वारी सेवेत सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी वारकऱ्यांसाठी प्रवासादरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. एका दिवसाच्या प्रवासासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक वैद्यकीय तपासणीची सुविधा आणि आवश्यक औषधांचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना आयोजकांनी सांगितले की, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. लाखो भाविकांच्या सुरक्षित प्रवासात एसटी चालक व वाहकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या सेवेला समाजाने नेहमीच योग्य सन्मान दिला पाहिजे.
कार्यक्रमात विविध मान्यवर, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि यापुढेही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.



