शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
मुक्ताईनगर तालुक्यातील भूसंपादन प्रश्नाबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, तसेच भूसंपादन करीत असताना दुजाभाव होता कामा नये, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्र. ७५३-एल (बोरगांव बुजूर्ग मुक्ताईनगर) येथील मौजे मुक्ताईनगर, अंतुर्ली व सातोड ता. मुक्ताईनगर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन दराबाबत व इतर प्रलंबीत विषयांबाबत नुकतीच विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ना. बावनकुळे यांनी निर्देश दिले आहेत.
इंदूर ते छत्रपतीसंभाजीनगर (एल-७५३) राष्ट्रीय महामार्गाचा मुक्ताईनगर तालुक्यातून जाणारा मार्ग काहीसा वळणाचा असून त्यामध्ये दिशा (अलाइनमेंट) बदल केल्यास संपूर्ण रस्त्याचे अंतर कमी होऊ शकते तसेच खर्चातही बचत होईल. महामार्गाच्या संदर्भात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले भूसंपादन करण्यात आलेल्या व ज्यांना भूसंपादनाचा मोबदला दिला आहे, याबाबत शासनस्तरावर तक्रारी प्राप्त होत असल्याने याबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे, असे ना. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना सुधारित दराने जमिनीचा मोबदला दिला पाहिजे – मंत्री गिरीश महाजन
शेत जमिनीचे भूसंपादन करताना यंत्रणांनी व्यक्तिभेद न करता सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने स्वीकारावी, जमिनीचे दहा-बारा वर्षा पूर्वीचे दर व आताचे चालू वर्षातील दर यामध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांना सुधारित दराने जमिनीचा मोबदला दिला पाहिजे, असे यावेळी राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी सुचित केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. तर दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी जळगाव आयुष्य प्रसाद, यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, प्रांत अधिकारी, भूसंपादनाधिकारी, शेतकरी संघर्ष समिती मुक्ताईनगर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.