जळगावसमस्या

जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीची कार्यवाही करा

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे निर्देश

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायती मध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रलंबित रजा रोखीकरण याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान यांनी दिले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी व निवेदनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस सहआयुक्त नगरपरिषद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विविध मुद्द्यांवर चर्चा
बैठकीत हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध व पुनर्वसन अधिनियम २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी, सफाई कर्मचाऱ्यांचे सुरक्षित कार्य वातावरण, वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण, शासकीय योजनांची अंमलबजावणी व कायम नियुक्तीसंबंधी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आयोगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांचा विचार करून धोरणात्मक उपाययोजना करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. तसेच, स्थानिक पातळीवरील संघटनांच्या मागण्या शासनस्तरावर धोरणनिर्धारणासाठी आयोगास सादर करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

बैठक संपल्यानंतर सफाई कामगार संघटनांनी उपाध्यक्षांचा सत्कार केला. श्री. सारवान यांनी हा सत्कार नम्रतेने स्वीकारून सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आयोगाने सर्व संबंधित संस्थांना आपल्या कार्यवाही अहवालांची प्रत वेळेत आयोगास सादर करण्याचे आदेश देत, आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button