
पोलीसांची मोठी कारवाई; एकाला अटक, तिघे फरार
रावेर (प्रतिनिधी) : शहरात मध्य प्रदेशातून अवैधरीत्या येत असलेल्या मोठया गुटखा साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यात दोन लाखांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर तीन जण फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर येथून (एमएच ०४ एचएन १७०९) क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या गाडीतून गुटख्याचा मोठा साठा रावेर शहरात आणला जात होता. याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वस्तिक टॉकीजजवळील ब-हाणपूर रोडवर छापा टाकून ही गाडी ताब्यात घेतली.
६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त
गाडीची तपासणी केली असता, त्यात एकूण २ लाख ३४ किमतीचा गुटखा आढळून आला. यामध्ये १८७ प्रति पाकीटप्रमाणे ३ मोठ्या गोण्या, ३३ प्रति पाकीटप्रमाणे ३ गोण्या, १९८ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या, २२ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या असा गुटखा होता. या गुटख्यासोबतच गुटखा वाहून नेणारी चार लाख रुपये किमतीची गाडीही जप्त करण्यात आली, ज्यामुळे एकूण ६ लाख ३४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात शेख मुजाहिद शेख रफिक (अटक), आसिफ अहमद जमील अहमद, कल्लू उर्फ मोहसिन शेख युनुस शेख आणि एक अनोळखी इसम अशा चार आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.