भातखंडे येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस!

पाचोरा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी, ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथे घरफोडीचा गुन्हा पाचोरा पोलिसांनी काही तासातच उघडकीस आणला असून एकाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून चोरी केलेला ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान भिकन कुमावत (वय ५१, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव) हे दि. १० नोव्हेंबर रोजी आपल्या नातलगांच्या लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम अंदाजे ४१,५०० रुपयांची लंपास केली होती. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्ह्याच्या गंभीरतेची दखल घेत पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तात्काळ तपास पथक तयार करून चोरीचा तपास सुरू केला. गुन्हा घडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भातखंडे खुर्द येथील रहिवासी कन्हैय्या विनोद कुमावत (वय २५) या तरुणाला अटक केली. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीत त्याच्याकडून चोरी केलेली संपूर्ण ४१,५०० रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमुळे पाचोरा पोलीस ठाण्याने अत्यंत कमी वेळेत एक गंभीर घरफोडी प्रकरण उघडकीस आणत जनतेत विश्वास निर्माण केला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने केली. पथकात सपोनि संजय निकुंभ, पोना महेंद्र पाटील, तुषार विसपुते, पोकोन संदीप राजपुत, जितेश पाटील, हरीश परदेशी, श्रीराम शिंगी, संतोष राजपुत आणि अनिल पवार यांनी सहभाग घेतला.




