आरोग्यक्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयसामाजिक

शहरात जिल्हा पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’

१६१ हुनअधिक गुन्हे दाखल, २६९ अधिकारी-अंमलदारांचा सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाने मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी एकाच वेळी संपूर्ण जिल्हाभर भव्य ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले. सायंकाळी सात वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत सलग चार तास चाललेल्या या मोहिमेत तब्बल २६९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. या धडक मोहिमेत जिल्हाभरात विविध गुन्ह्यांची नोंद, तपासण्या आणि नियमभंगावरील कठोर कारवाया करण्यात आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेदरम्यान २,४५८ वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात आली. तसेच ८२ तडीपार आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. जिल्हाभरात विविध कायद्यांअंतर्गत एकूण १६१ पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात दारूबंदी कायद्यान्वये ९०, जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये ३४, शस्त्र कायद्यान्वये १ तर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये तब्बल २२ गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत १४ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली असून, एकूण १४८ प्रलंबित वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील १३५ हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. याशिवाय मोटार वाहन कायद्यांतर्गत नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध ६७१ प्रकरणांत कारवाई करून पोलिसांनी ₹५ लाख १० हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा धडक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ची मोहीम पुढील काळातही सातत्याने राबवली जाणार आहे. जिल्हाभरातील पोलिसांच्या या समन्वित आणि शिस्तबद्ध कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झाली असून, कायदा व सुव्यवस्था टिकवण्याच्या दिशेने पोलिसांची ही मोहीम प्रभावी ठरल्याचे चित्र दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button