कंडारी शाळेत अवतरले अवघे पंढरपूर

पालखी,ग्रंथदिंडीने परिसरात फुलला भक्तीचा मळा
जळगाव – ( प्रतिनिधी ) आषाढी एकादशीच्या निमित्ताने तालुक्यातील कंडारी जिल्हा परिषद मराठी शाळेत अवघे पंढरपूर अवतरले होते. पालखी, ग्रंथदिंडी परिसरात भक्तीचा मळा फुलला होता.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेची पूजा झाली. त्यानंतर टाळ, मृदंगाच्या गजरात आणि संत परंपरेतील अभंग,भक्तिरचनांनी वातावरणफ भक्तिमय झाले.यावेळी चिमुकल्यानी दिंडी काढली. श्रीविठ्ठलाची वेशभूषा साकारण्यात आली.
कंडारी येथील पंचरंगी भजनी मंडळाच्या सदस्यांनी पारंपरिक भजने सादर केली. गोपाळ रिवाजकर, रवी धनगर, प्रभाकर धनगर, राजू सोनवणे, गोलू धनगर, विठोबा धनगर यांच्या भजनांनी आसमंत दुमदुमला.
दिंडीतील विशेष आकर्षण म्हणजे पालखीत ‘बालभारती’च्या पुस्तक ठेवून पुस्तकांची दिंडी काढण्यात आली. विद्यार्थिनींनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली. या उपक्रमातून वाचन,शिक्षणाचे महत्व यासह समाजप्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोप सामूहिक अभंगगायन, नामस्मरण, पावली आणि फुगडी खेळाच्या माध्यमातून झाला. यावेळी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास मंजुषा पाठक, राजाराम पाटील, सुनंदा रोझदकर, सविता निंभोरे, ज्योती वाघ, डॉ. जगदीश पाटील, विनोद जयकर, गणेश तांबे, शाम चिमणकर आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.