
स्त्रीशक्तीचा जागर आणि स्त्रीशक्तीचा सन्मान – विद्यार्थ्यांनी साकारली देवीची रूपं
रावेर (प्रतिनिधी) : स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर येथे नवरात्र आणि दसरा सणानिमित्त एक आगळावेगळा व प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. रावण दहनाच्या पारंपरिक प्रथेला बाजूला ठेवत, यावर्षी शाळेने ‘स्त्री शक्तीचा जागर’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्त्रियांविषयी आदराचे मूल्य रुजवणे हा होता.
कार्यक्रमात देवीच्या नऊ रूपांबरोबरच आधुनिक भारतातील प्रेरणादायी महिलांच्या भूमिका विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावीपणे साकारल्या. यामध्ये राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, डॉ. आनंदीबाई जोशी, पी. टी. उषा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अहिल्याबाई होळकर, विंग कमांडर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग अशा विविध क्षेत्रातील स्त्रीशक्तीचे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांनी उभे केले.
पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांची नृत्य, नाट्य आणि सादरीकरणाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीची सुंदर मांडणी पाहून उपस्थित सर्व प्रेक्षक भारावून गेले. ध्येय प्रयत्न सफलता या ब्रीदवाक्य प्रमाणे शाळेचे चेअरमन रवींद्र पवार, मनिषा पवार यांच्या मार्गदर्शनाने
या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक रतीष मौन आणि पर्यवेक्षिका अनिता पाटील शिरिष मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज महाजन व समीर खराले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास शाळेच्या संचालिका डॉ. सुखदा पवार, श्री. पुष्पक पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू पवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे आणि पर्यवेक्षिका कीर्ती निळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्याध्यापक राजू पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, “स्त्री शक्ती” ही आपल्या संस्कृतीचे प्रतीक असून, ती आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीमध्ये वसलेली आहे, असे मार्मिक भाष्य केले. तसेच, डॉ. सुखदा पवार यांनी विद्यार्थ्यांच्या उर्जेचे आणि सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत आपल्या मनोगतातून स्त्रीशक्तीच्या गौरवाची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्त्रीविषयी आदर, गौरव व प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न शाळेने केला असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा एक स्तुत्य उपक्रम ठरला.




