सीईओ मीनल करनवाल व आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून रावेरमध्ये पोषण माह उत्सव

जळगाव (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पोषण अभियान धोरणानुसार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच रावेर पंचायत समितीत पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने अंगणवाडी सेविकांनी मुलांच्या दृष्टीने पौष्टिक व चवदार अशा विविध रेसिपी तयार करून सादर केल्या. मुलांना संतुलित व पोषक आहार मिळावा, तसेच मातांमध्ये आहाराविषयी जागरूकता वाढावी हा मुख्य उद्देश होता. आहार प्रदर्शनामध्ये ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूरक पोषण आहार “प्रोटो विटा” तसेच गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या आहार प्रदर्शनाला आमदार अमोल जावळे आणि मीनल करनवाल यांनी भेट देत पाहणी केली.
समाजात पोषणमय जीवनशैली रुजविण्यास होणार मोठी मदत
याशिवाय या रेसिपींना अधिक व्यापक पोहोच मिळावी म्हणून महिनाभरासाठी ३० व्हिडिओ तयार करण्यात येणार असून ते आई व महिलांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक आईला घरी सहज करता येणाऱ्या पौष्टिक व आरोग्यदायी रेसिपींची माहिती मिळणार आहे. या उपक्रमामुळे बालकांच्या आरोग्य, पोषण व सर्वांगीण विकासाबरोबरच आई-मातांना मार्गदर्शन मिळून समाजात पोषणमय जीवनशैली रुजविण्यास मोठी मदत होणार आहे.




