
जळगाव (प्रतिनिधी) : जुनाखेडी रोडवरील साईगिता नगरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, ओम गोपालसिंग चव्हाण हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेल्याने साईगिता नगरातील घर बंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा कापून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे अस्ताव्यस्त करत चोरट्यांनी एक लाख ९३ हजार १८३ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले. १८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत यादरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज आहे. कुटुंबिय घरी परतल्यानंतर सर्वत्र सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि दागिने गायब असल्याचे आढळताच त्यांनी पोलिसांना कळवले.
तक्रारीनुसार शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले यांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपासाला गती देण्यात आली आहे.




