वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी रोटरी महावाचन अभियान

नोंदणी करणे आवश्यक; जळगावकरांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, वाचन प्रेरणा दिनी रोटरी महावाचन अभियान राबविण्या आले आहे. या अंतर्गत गणपती नगरातील रोटरी सभागृहात बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जळगावकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी दिली केले आहे.
रोटरी महावाचन अभियानात १५०० हून अधिक नागरिक किमान १० मिनिटे वाचन करून यात सहभागी होणार आहेत. एकत्रित वाचन कालावधी १५ हजार मिनिटे असा हा उपक्रम सुरू राहील. हे अभियान सर्व नागरिक – विद्यार्थ्यांसाठी मोफत असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. मात्र नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सोबतच्या https://forms.gle/5P2aRV9Cyfg22umb8 लिंक वर क्लिक करून नोंदणी फाॅर्म भरावयाचा आहे.
वाचकास सहभाग प्रमाणपत्र
प्रत्येक सहभागी वाचकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. रीडर स्पीक्स अर्थात वाचकांना लेखी व ऑडिओ – व्हिडिओ स्वरूपात प्रतिसाद नोंदवण्याची किंवा अभिप्राय व्यक्त करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाचन अभियान सहभाग स्मृती म्हणून सेल्फी पॉईंटची निर्मिती आणि अभियानात सहभागी वाचकांना रीडर्स वॉलवर स्वाक्षरी करता येणार आहे. तसेच या अभियानाचा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा पर्यन्त करण्यात येणार आहे.
जळगावकरांनी परिवारासोबत येण्याचे आवाहन
कुटुंब सदस्यांसह सहभागी झालेल्या परिवाराचा वाचक कुटुंब म्हणून फोटो काढण्यात येणार आहे. वाचनामुळे कल्पनाशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, ताण कमी होतो, भाषाशैली सुधारते, ज्ञान वाढते, निर्णयक्षमता वाढते, एकाग्रता सुधारते, सहिष्णुता वाढते, व्यक्तिमत्व घडते आणि जीवन समृद्ध होते. त्यामुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत करणाऱ्या या अभियानात जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, प्रोजेक्ट चेअरमन विजय जोशी, को-चेअरमन पंकज व्यवहारे यांनी केले आहे. मानस सचिन सुभाष अमळनेर यांनी आभार मानले.




