क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयसमस्या

जळगावात कोंबिंग ऑपरेशन; ८४ गुन्हेगार गजाआड

गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस दलाची मोठी मोहीम

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलाने गुरुवारी पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. या धडक कारवाईत ८४ हून अधिक विविध गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील भागांना लक्ष्य करून ही मोहीम राबवण्यात आली.

अटकेत असलेल्यांमध्ये हद्दपार केलेले, इतर गुन्ह्यांमधील फरार असलेले, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, चोरटे आणि दारू विक्रेते यांचा समावेश आहे. हे सर्व गंभीर गुन्हेगार संबंधित पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. विशेषतः, विनापरवानगी हद्दपार असताना शहरात पुन्हा दाखल झालेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलीस पथकांनी सक्रिय सहभाग
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी या कारवाईचे नियोजन केले. या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर ल, एमआयडीसीचे बबन आव्हाड, जिल्हापेठचे प्रदीप ठाकूर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे आणि रामानंदनगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह प्रत्येक पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस पथकांनी सक्रिय सहभाग घेतला.

जिल्हा पोलीस दलाने शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारची मोहीम राबवून गुन्हेगारांना जरब बसवली आहे. भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button