
ग्रामस्थानांचे ग्रामसेवक यांनी निवेदन
धामोडी (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील धामोडी गावातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तातडीची मागणी धामोडी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. अलीकडील काही दिवसांत गावात घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे तसेच मंदिर परिसरात झालेल्या असभ्य प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गावातील तोल काटा येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात कोणी तरी थुंकून असभ्य वर्तन केल्याची घटना घडली. या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून गावभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पुढे आली आहे.
या संदर्भात ग्रामसेवक कपिला गावित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार राहुल जैन, रविंद्र मेढे, गोपाळ पाटील, भूषण महाजन आदी उपस्थित होते. निवेदन स्वीकारताना ग्रामसेवक कपिला गावित यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या मागणीची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
सीसीटीव्ही कॅमेरे बसल्यास संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे सोपे जाईल आणि चोरी, असभ्य प्रकार तसेच इतर गैरकृत्यांवर नियंत्रण येऊ शकेल. ग्रामपंचायत स्तरावर गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतीने या मागणीची तात्काळ दखल घेऊन गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




