कलाकारजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणसामाजिक

पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम यांचा २७ रोजी जळगावमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा

पत्रपरिषदेत समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांची माहिती, जळगावकरांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : देशाचे ख्यातनाम विशेष सरकारी वकील, पद्मश्री सन्मानित आणि अलीकडेच राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेले अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे रविवार, २७ रोजी सायकांळी ५ वाजता भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येत जळगावकरांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.

या सत्काराचे आयोजन भव्य स्वरूपात व्हावे यासाठी जळगाव शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असलेली “नागरी सत्कार आयोजन समिती” स्थापन करण्यात आली असून, अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची सर्वानुमतीने निवड करण्यात आली आहे. या आयोजनाचे स्वरूप व इतर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते होणार सत्कार
या सत्कार सोहळ्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर एक माहितीपट देखील तयार करण्यात आला आहे. ती कार्यक्रमावेळी दाखविला जाईल. नागरी सत्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे,आमदार एकनाथराव खडसे, किशोर दराडे, सत्यजित तांबे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आगमनानंतर स्वागत मिरवणूक
रविवारी सकाळी ६.१५ वाजता अ‍ॅड. उज्वल निकम यांचे जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेशन ते बॅरिस्टर निकम चौकपर्यंत स्वागत मिरवणूक काढण्यात येईल. तसेच भाजप कार्यालय, जी. एम. फाउंडेशन येथे छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला असून त्यानंतर सायंकाळी ५ वा. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे मुख्य नागरी सत्कार समारंभ होणार आहे. हा कार्यक्रम सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला असून अ‍ॅड. निकम यांना गौरविण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी सन्मान सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला राज्य पणन महासंघाचे पदाधिकारी रोहित निकम, शंभू पाटील, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, अ‍ॅड. सुशील अत्रे, राम पवार, एजाज मलिक, पांडुरंग काळे, संगीता पाटील, अशोक लाडवंजारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button