
▪️पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘बहिणाबाई मार्ट’चे उद्घाटन
▪️शहराच्या मध्यवर्ती भागात बचत गटांना मिळणार बारमाही विक्री व खाऊ गल्लीचा आधार
▪️जिल्हा भरात सुरू होणार आणखी १० बहिणाबाई मार्केट :‘खाऊ गल्ली’साठी स्वतंत्र गाळ्यांची योजना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील राजकमल टॉकीजजवळ जिल्हा परिषद बचत भवन इमारतीत ‘बहिणाबाई मार्ट’ या विशेष प्रकल्पाचे आज जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकोपयोगी प्रकल्प आज जनतेच्या सेवेत दाखल झाला.
या प्रकल्पाअंतर्गत जळगावातील नागरिकांना आता वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने खरेदी करता येणार असून, त्याचबरोबर पारंपरिक चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचीही संधी मिळणार आहे. “महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. बहिणाबाई मार्ट आणि खाऊ गल्लीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल,” असे उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढले. लवकरच या मार्टमध्ये ‘खाऊ गल्ली’ कार्यान्वित होणार असल्याची माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.
कोंबडी मार्केटमध्ये बहिणाबाई मार्ट कार्यरत
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, तसेच माजी महापौर विष्णू भंगाळे उपस्थित होते. जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या कोंबडी मार्केट इमारतीतील २० गाळ्यांमध्ये हे बहिणाबाई मार्ट कार्यरत करण्यात आले आहे. हे गाळे प्रभाग संघ निहाय अदलाबदल करून वापरण्याची सुविधा असून, नाममात्र भाडे आकारले जाणार आहे.
जिल्हाभरात १० ठिकाणी भूमिपूजन
जिल्ह्यात सध्या ३१ हजार महिला बचत गट कार्यरत असून, त्यांचे ६७ प्रभाग संघ आहेत. सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून आजवर गटांच्या उत्पादनांची विक्री होत होती. मात्र, त्याला बारमाही आणि स्थायी बाजारपेठ मिळावी या हेतूने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून ‘बहिणाबाई मार्केट’ उपक्रमाचा प्रारंभ झाला. या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्हाभरात १० ठिकाणी बहिणाबाई मार्केटसाठी भूमिपूजन पार पडले आहे. यासाठी अनेक ठिकाणी कामास सुरुवातही झाली असून, काही ठिकाणी लवकरच हे मार्केट सुरू होणार आहे.
लवकरच ‘खाऊ गल्ली’, खवय्याच्या सेवेत
सरस प्रदर्शनांमध्ये खाण्याच्या स्टॉलवर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. सुगरणींच्या हातच्या पारंपरिक चविष्ट पदार्थांना मागणी असते. हे लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी इमारतीतील अंतर्गत गाळ्यांमध्ये खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बचत गटांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने येत्या १५ दिवसांत खवय्यांसाठी खास ‘खाऊ गल्ली’ सुरु होणार आहे. हे बहिणाबाई मार्ट महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे नवे मापदंड निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.