विभागीय टोस्टमास्टर्स स्पर्धेत जी. एच. रायसोनीचे विध्यार्थी ठरले विजयी वक्ते

रिया भंगाळे ठरली विजेती, स्वप्निलचा तृतीय क्रमांक
जळगाव (प्रतिनिधी) : इंदूर येथील अॅक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च येथे नुकतीच टोस्टमास्टर्स एरिया ए–३ आणि ए–४ संयुक्त वक्तृत्व आणि संवादकौशल्य मूल्यांकन स्पर्धा म्हणजेच ‘अरेना १.०’ पार पडली. या स्पर्धेत दोन्ही क्षेत्रांतील विविध क्लबमधील टोस्टमास्टर्स सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील “रायसोनी माएस्ट्रो टोस्टमास्टर्स क्लब” कडून टी. एम. स्वप्निल श्रावणे आणि टी. एम. रिया भंगाळे यांनी वक्तृत्व स्पर्धेत, तर टी. एम. गोविंद मंधान आणि टी. एम. प्रियल सोनवणे यांनी संवादकौशल्य मूल्यांकन स्पर्धेत सहभाग नोंदवला.
टी. एम. रिया भंगाळे हिने आपल्या वक्तृत्वातील चातुर्य आणि प्रभावी मांडणीद्वारे परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक, तर टी. एम. स्वप्निल श्रावणे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून तृतीय क्रमांक पटकावला. रिया भंगाळे आता एरिया ए–३ चे प्रतिनिधित्व करत डिव्हिजन स्तरावरील स्पर्धेत भाग घेणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सर्व सहभागी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. टोस्टमास्टर्स क्लब ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून जगभरातील अनेक कॉर्पोरेट कर्मचारीही याचे सदस्य आहेत. अध्यक्ष सुनील रायसोनी यांचे नेहमीच व्हिजन राहिले आहे की विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे, तर जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सकारात्मक मूल्यांची जोड दिली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
“अरेना १.०” या स्पर्धेत एरिया ए–३ आणि ए–४ मधील ९ हून अधिक क्लब्सनी सहभाग नोंदवला होता. यावेळी विद्यार्थ्यांना प्रा. प्रिया टेकवानी यांचे सहकार्य लाभले. अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




