ताज्या बातम्याजळगाव

डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी महापौर दीपमाला काळे यांचा गौरव

लेवा एज्युकेशनल युनियनतर्फे यथोचित सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) : लेवा एज्युकेशनल युनियन, जळगाव आणि डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या वतीने जळगावच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांचा आज यथोचित सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सन्मानार्थी परिचय आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. स्मिता चौधरी यांनी केला. लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या हस्ते महापौर दीपमाला काळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातर्फे सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सन्मानप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महापौर दीपमाला काळे यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत, स्वतःची ओळख निर्माण करण्याचे संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा या महाविद्यालयातूनच मिळाल्याचे सांगितले. जळगाव शहराच्या विकासासाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी कार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

यानंतर प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी शुभेच्छापर मनोगतातून माजी विद्यार्थिनी ते महापौर हा प्रवास महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. महिला सक्षमीकरण व पर्यावरण संरक्षणास प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी महापौरांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमास विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, कला व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य सौ. सुनीता पाटील तसेच आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. स्मिता चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार यांनी केले. कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button