
रावेर, (प्रतिनिधी) : रावेर येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था मॅक्रो व्हिजन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गत वर्ष 2024 पासून नियमित योगवर्गांची सुरुवात करण्यात आली आहे. या योगवर्गामध्ये पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांपासून तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे.
सकाळी शाळा सुरू होण्याआधी हे वर्ग घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये योगाभ्यासाबाबत चांगली उत्सुकता दिसून येत असून, विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचा सराव नियमितपणे केला जात आहे. योग हा आपल्या प्राचीन परंपरेचा अमूल्य ठेवा आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच योगाची सवय लावली, तर ते निरोगी आयुष्य जगू शकतील, असे शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व प्राचार्य जनार्दन धनगर यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी विशेष योग प्रशिक्षक रामलाल इंगळे यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. मॅक्रो व्हिजन स्कूलच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून, योगशिक्षणाद्वारे शाळा आरोग्य आणि शिक्षणाचा समतोल राखत आहे.
या उपक्रमाला शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील यांनी प्रेरणा दिली. तसेच शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. शाळेचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले यांनीही या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.