
महाविद्यालयातील ११ निवडक विद्यार्थिनींना मोफत विशेष कोर्स
जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव आणि टेन एआयज् प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विद्यार्थिनींच्या कौशल्य विकासासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) नुकताच झाला आहे. या करारांतर्गत टेन एआयज् कंपनीने महाविद्यालयातील ११ निवडक विद्यार्थिनींना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) क्षेत्रातील प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी १० आठवड्यांचा विशेष कोर्स मोफत उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच प्रत्येक विद्यार्थिनीला १५ हजार रुपये विद्यावेतन (Stipend) देण्याची घोषणाही कंपनीने केली आहे.
या कोर्सच्या उद्घाटनाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.जे. पाटील यांच्या हस्ते शनिवार १२ जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने झाला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद तायडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, डी.एस.कट्यारे, कोर्सच्या हेड ऑफ स्टुडिओ स्वरदा ओगले, प्रा.डाॅ.स्मिता चौधरी, समन्वयक डॉ. हर्षाली पाटील, डॉ. मोनाली खाचणे, प्रा. वैशाली विसपुते, प्रा. देपुरा मॅडम यांच्यासह निवडक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
टेन एआयज् प्रायव्हेट लिमिटेड ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अग्रगण्य असलेली कंपनी आहे. या उपक्रमात कंपनीच्या संचालिका प्रीती चांदोरकर, हेड ऑफ प्रोडक्ट्स आर्या चांदोरकर, हेड ऑफ स्टुडिओ स्वरदा ओगले आणि हेड ऑफ इंजीनियरिंग सिद्धांत गाडे यांनी विशेष परिश्रम घेऊन विद्यार्थिनींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित एक सर्वसमावेशक कोर्स तयार केला आहे. हा कोर्स विद्यार्थिनींना AI तंत्रज्ञानातील नवीन संकल्पना, त्यांचा व्यावहारिक उपयोग आणि उद्योगातील आव्हाने यांचे सखोल मार्गदर्शन करेल. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींना भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त होणार आहेत.
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय हे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहे. या कराराद्वारे महाविद्यालयाने विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचार्य डॉ. व्ही.जे. पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की, “हा करार विद्यार्थिनींच्या भविष्यासाठी एक मैलाचा दगड ठरेल. टेन एआयज् सारख्या नामांकित कंपनीसोबत झालेल्या या सहकार्यामुळे आमच्या विद्यार्थिनींना जागतिक स्तरावरील कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल.”
हा १० आठवड्यांचा कोर्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील नवीनतम घडामोडींवर आधारित आहे. यामध्ये मशीन लर्निंग, डेटा ॲनालिसिस, डीप लर्निंग आणि AI च्या व्यावहारिक अनुप्रयोगांचा समावेश आहे. या कोर्सद्वारे विद्यार्थिनींना केवळ सैद्धांतिक ज्ञानच मिळणार नाही, तर प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधीही मिळेल. यामुळे त्यांना उद्योगातील वास्तविक आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार होण्यास मदत होईल.
या आहेत निवड झालेल्या विद्यार्थीनी
या इटर्नशिप साठी द्वितीय व तृतीय संगणक शास्त्र या विषयाच्या ११ विद्यार्थीनींची निवड झाली. त्यात भाग्यश्री पाटील, आकांक्षा आढाव, दुर्गा विसपुते, यामिनी पाटील, चंद्रमा पाटील, गीतांजली पाटील, लीना खैरनार, प्रेरणा काळे,शितल जाधव, लक्ष्मी चौधरी, वैष्णवी वाणी यांचा समावेश आहे. कोर्सच्या समन्वयक डॉ. हर्षाली पाटील यांनी सांगितले की, “या कोर्ससाठी निवड झालेल्या ११ विद्यार्थिनी अत्यंत गरीब -गरजू त्यासोबत उत्साही आणि सक्षम आहेत. त्यांना टेन एआयज् सारख्या कंपनीकडून मार्गदर्शन मिळणे ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे.” यावेळी उपस्थित उपप्राचार्य व कट्यारे यांनी उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींना याचा पूर्ण लाभ घेण्याचे आवाहन केले.
या सामंजस्य करारामुळे महाविद्यालय आणि टेन एआयज् यांच्यातील सहकार्य आणखी दृढ होणार आहे. भविष्यात आणखी विद्यार्थिनींना अशा संधी उपलब्ध करून देण्याचा मानस दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात झपाट्याने होणारी प्रगती लक्षात घेता, अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे विद्यार्थिनींना रोजगारक्षमता वाढवण्यास आणि स्वतःला जागतिक स्तरावर सिद्ध करण्यास मदत होईल.या उपक्रमामुळे जळगावच्या विद्यार्थिनींना तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवी दिशा मिळाली असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरेल,असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व संचालक मंडळ यांनी व्यक्त केला आहे.