
रावेर (प्रतिनिधी) : सावखेडा ते मोहमांडळी मार्गावरील साईड पट्ट्यांची दुरवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामामुळे परिसरातील शेतकरी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड पट्ट्या खराब झाल्याने वाहतुकीदरम्यान अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः ट्रॅक्टर व इतर मोठ्या वाहनांना रस्ता ओलांडताना त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने दखल घेत काम सुरू केले.
सध्या जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरूम टाकून समतलीकरण केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यास मदत होणार आहे.



