
रावेरच्या स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक सभा उत्साहात
रावेर, (प्रतिनिधी) : येथील स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवार, १२ रोजी पार पडलेल्या पालक सभेला उत्तम प्रतिसाद लाभला. नर्सरीपासून ते दहावीपर्यंत सर्व वर्गातील पालक या सभेला उपस्थित राहिले.
या पालक सभेचे विशेष आकर्षण म्हणजे आर.टी.ओ. सहाय्यक वाहतूक निरीक्षक राहुल काळे यांची उपस्थिती होती. त्यांनी पालक आणि शालेय वाहन चालकांना वाहतूक नियमांचे महत्व पटवून दिले. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.
सभेस संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार, संचालिका डॉ. सुखदा पवार आणि संचालक पुष्पक पवार यांची उपस्थिती लाभली. शाळेचे प्राचार्य रतिश मौन यांनी शाळेतील प्रगती, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची घडवणूक आणि भविष्यातील योजना यांची सविस्तर माहिती उपस्थित पालकांना दिली.
उपमुख्याध्यापक अनिता पाटील मॅडम यांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वयाबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.संचालक पुष्पक पवार यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार यांनी पालकांच्या अडचणी समजून घेत संवाद साधला आणि पालक-शाळा संबंध अधिक दृढ होण्यासाठी आपल्या भावना मांडल्या. सूत्रसंचालन गौरांगीनी कासार आणि आशा भावसार यांनी केले. आभार अनिता पाटील यांनी मानले.