
रावेर (प्रतिनिधी) : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर शाळेत 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिवतीर्थ मैदाना पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीने झाली.
रॅलीनंतर शाळेत विद्यार्थ्यांना जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व तसेच “दिव्यांग व्यक्ती ही समाजाची प्रेरक शक्ती असून, त्यांच्यातील क्षमतेला निदर्शनास आणून दिल्यास ते कोणतेही कार्य यशस्वीरीत्या पार पाडू शकतात” याबाबत डिजिटल एलसीडी प्रोजेक्टर द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. सोबत याप्रसंगी जागतिक स्तरावरील यशस्वी दिव्यांग व्यक्तींनी मिळविलेल्या सुयशाबद्दलची प्रेरणादायी चित्रफीत दाखवून माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दिव्यांगांचे प्रेरणास्थान हेलन केलर व विद्येची देवता शारदा माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील प्रथित यश बांधकाम व्यवसाय तथा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व समाजसेवक सुनील भारंबे, सागर पाटील, निलेश तायडे, शालेय समिती अध्यक्षा डॉ. वैजयंती पाद्येताई, मुख्याध्यापिका ज्योती खानोरे उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत डॉ. वैजयंती पाध्येताई यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा शिक्षिका अश्विनी कुलकर्णी यांनी तर शाळेची माहिती ज्येष्ठ विशेष शिक्षिका नीलिमा तरवटे यांनी दिली. कार्यक्रमानंतर 50 मीटर आणि 200 मीटर धावण्याच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन कलाशिक्षक गिरीश बडगुजर आणि विशेष शिक्षिका जयश्री चिरमाडे यांनी केले.




