
वारली संस्कृतीवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी ग्रामीण भागातील लोक संस्कृती मोठ्या श्रद्धेने आजही सांभाळतांना दिसून येतात. दरम्यान विद्यार्थ्यांना विविध सण उत्सवाची माहिती व्हावी यासाठी मेहरूण मधील संत ज्ञानेश्वर विद्यालयात माता पालक संघातर्फे भुलाबाईची स्थापना करण्यात आली आहे. विविध संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून वारली संस्कृती वर आधारित चित्रकला स्पर्धा सुद्धा या निमित्ताने घेण्यात आली.
शाळेमध्ये भुलाबाई-भुलोजीच्या मातीच्या मूर्ती प्रस्थापित करून गाणी गायली गेली. भुलाबाई कथा कला प्रकार हा मुलींना सासरी कस वागवावं याची शिकवण देते कारण सासर म्हणजे फक्त एक कुटूंब नाही तर समाज आहे आणि भुलाबाईच्या स्वरूपातील प्रत्येक मुलगी दोन कुटूंबांना एकत्र करून भावी आदर्श समाजाचे सृजन करणारा एक दुवा असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. उपक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




