पीकविमा नुकसान भरपाईत शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा – डॉ. राधेश्याम चौधरी

यावल तालुक्यातील बामणोद परिसरातील 15 गावांच्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील अंजाळे सर्कल मधील बामणोद परिसरातील 15 गावांच्या शेतकऱ्यांच्या सोबत अन्यायकारक केळी पिक विमा नुकसान भरपाई संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार व आमदार अमोल जावळे यांच्या सुचनेनुसार भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देऊन पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवा, अशी मागणीही डॉ. राधेश्याम चौधरी यांनी यावेळी केली.
निवेदनात म्हटले आहे की, बामणोद परिसरातील पंधरा गावातील 975 हेक्टर जमिनीवरील केळी पिक विमा नुकसान भरपाईत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हजारो शेतकऱ्यांना कोटावधीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंजाळे येथे हवामान केंद्रावर कोणतीही हवामानविषयक यंत्रे नाहीत. भुसावल तालुक्यातील साकेगाव सर्कलच्या हवामान केंद्राच्या अहवालानुसार यावल तालुक्यातील या 15 गावांच्या शेतकऱ्यांना हेक्टरी 74500/ रू.ऐवजी हेक्टरी 42500/रू.नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व मनमानीपणामुळे अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी ही कृती आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत शेतकऱ्यांना त्यांची न्याय्य भरपाई ची रक्कम मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना संपर्क करून प्रत्येक सर्कलमध्ये हवामान विषयक यंत्रे लावून यापुढे अशा प्रकारच्या चुका होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या. सर्वांचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याची तांत्रिक कारणे दाखवून अशा प्रकारची पिळवणूक होऊ नये ही रास्ता अपेक्षा आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी 15 गावांमधील सुजित चौधरी, जितेंद्र चौधरी, निलेश चौधरी, दीपक चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, गिरधर चौधरी, जगदीश पाटील, विकास पाटील, कल्पेश पाटील, धनराज कोळी, लिलाधर चौधरी, प्रशांत पाटील, दीपक पाटील आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




