आदिवासी महिला बचत गटाच्या सदस्या हिना तडवी यांचे दिल्लीत सादरीकरण!

२७ सहभागी राज्यांतून दोन प्रतिनिधींमध्ये जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी आमंत्रित
जळगाव (प्रतिनिधी) : दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित “आदी कर्मयोगी राष्ट्रीय परिषद (National Conclave)” मध्ये जळगाव जिल्ह्यातील लोहारा (ता. रावेर) येथील आदी सहयोगी – आशियाना महिला बचत गट प्रतिनिधी हिना अरुण तडवी (हिना जमादार) यांनी “उपजीविका आणि उद्योजकता रोजगार” या विषयावर प्रभावी सादरीकरण केले.
विशेष म्हणजे, 27 सहभागी राज्यांतून फक्त दोन प्रतिनिधींना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले होते, त्यापैकी एक म्हणून जळगाव जिल्ह्याची निवड झाली.
या परिषदेत व्यासपीठावर मान्यवर म्हणून दीपाली मासिरकर (IAS), संचालक – जनजातीय कार्य मंत्रालय (MOTA); विभू नायर, सचिव – जनजातीय कार्य मंत्रालय; एम. राजामुर्गन (IPS), व्यवस्थापकीय संचालक – TRIFED; मनिंदर द्विवेदी, अतिरिक्त सचिव – कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय; बी. एन. प्रसाद, संयुक्त संचालक – MOTA; हिमांशू रत्तन, पार्टनर – KPMG; तसेच महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड आणि सचिव विजय वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्राला “सर्वोत्कृष्ट कामगिरी असणारे राज्य” पुरस्कार प्राप्त
तसेच केंद्र सरकारच्या ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र स्तरावरील “सर्वोत्कृष्ट कामगिरी असणारे राज्य” पुरस्कार प्राप्त झाला. दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत (नॅशनल कॉन्क्लेव्ह) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. व्यासपीठावर केंद्रीय जनजातीय कार्य मंत्री जुवेल ओराम, राज्यमंत्री दुर्गादास उईके, जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव विभू नायर आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदी कर्मयोगी राष्ट्रीय परिषदच्या मुख्य अतिथी होत्या. या राष्ट्रीय परिषेद मध्ये केंद्रीय मंत्री देशभरातील सर्व राज्यांमधील सचिव, सहसचिव, जिल्हाधिकारी तसेच राज्य आणि जिल्हा मास्टर ट्रेनर, आदी साथी आणि आदी सहयोगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सादरीकरणातील मुद्दे आणि संवाद
सादरीकरणादरम्यान मान्यवरांनी आशियाना महिला बचत गटाच्या कार्याबद्दल चौकशी केली असता, हिना तडवी (हिना जमादार) यांनी त्यांच्या गटाच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गटातील महिला वारली पेंटिंग तयार करून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. यामुळे महिलांना स्वावलंबन आणि आर्थिक स्थैर्य लाभत आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या
“आमच्या परिसरात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, तसेच गहू, ज्वारी आणि इतर धान्यपिके घेतली जातात. मात्र, केळी साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज आणि धान्य स्वच्छतेसाठी यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांना बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात घट होते.” जर अशा सुविधा महिला बचत गटाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर सुरू केल्या, तर महिलांना रोजगार मिळेल, तसेच शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल, असेही हिना तडवी यांनी सुचवले.
विकासाचे आराखडे मंजूर झाल्यास रोजगाराच्या संधी
तसेच त्यांनी सांगितले की, गावात युवक आणि महिलांसाठी खरेदी-विक्रीची स्थानिक दुकाने उपलब्ध झाली, तर तेथेही रोजगारनिर्मिती होईल. गावाजवळील पाल पर्यटन स्थळ असल्याने, पर्यटनविकासाच्या संधी निर्माण करून पर्यटकांना आवश्यक सुविधा दिल्या, तर स्थानिक स्तरावर आणखी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. हिना तडवी यांनी नमूद केले की, या उद्देशाने 17 विविध विभागांमध्ये विकासाचे आराखडे (Plans) तयार करण्यात आले आहेत आणि हे आराखडे मंजूर झाल्यास गावात उपजीविका, उद्योजकता आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना नवे बळ मिळेल.
राज्यातून आपली निवड झाली होती 20 मध्ये जळगांव जिल्ह्यातून जिल्हा मास्टर ट्रेनर इंजि अजित जमादार, प्रशांत माहुरे सहा.प्रकल्प अधिकारी, हिना अरुण तडवी (हिना जमादार) आदी सहयोगी व राजेंद्र तडवी ग्रामसेवक लोहारा यांची निवड करण्यात आली होती. उत्कृष्ट VAP व नियोजन केलेने निवड करण्यात आली होती.




