रावेरच्या स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन

रावेर (प्रतिनिधी) : स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि सुसूत्र पद्धतीने केले. संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या हस्तेच पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी बारी व पृथ्वी पाटील या विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण व प्रभावी पद्धतीने केले.
शिक्षक दिनाचे महत्त्व आणि डॉ. राधाकृष्णन यांचे प्रेरणादायी जीवनकार्य याविषयी पाखी शिवरामे, प्रतुषा कोंगे व मोहित चौधरी यांनी माहितीपर सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा मान राखत त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गुरुदक्षिणा म्हणून एक छोटंसं गिफ्ट सादर केले.
या कार्यक्रमाला स्वामी एज्युकेशन ग्रुपच्या संचालिका डॉ. सुखदा मॅडम, मुख्याध्यापक डॉ. रतिष मौन, उपमुख्याध्यापिका अनिता शिंदे, शिरीष मैराडे, शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सातवी व आठवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने झाली, जो शिक्षकांना मानवंदना म्हणून अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये गुरूजनांविषयीचा आदर अधिक दृढ झाला असून, शाळेतील एकात्मतेचे व संस्कारांचे दर्शन घडले.




