खोटेनगर-पाळधी रस्त्यासाठी ३० कोटी मंजूर- ना. गुलाबराव पाटील

पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यांची पालकमंत्र्यांकडून पाहणी
जळगाव( प्रतिनिधी )- खोटेनगर ते पाळधी या रस्त्याच्या विकासासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बायपासचे काम पूर्ण होताच या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. शहरातील अवजड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा बायपास महत्त्वाचा ठरणार असून, त्यामुळे शहरातील वाहतूक शहराबाहेर वळवली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह त्यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा असलेला पाळधी ते तरसोद दरम्यानचा १७.७० किलोमीटर लांबीचा बायपास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (NH-53) दोनच महिन्यांत वाहतुकीसाठी खुला होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाहणीदरम्यान पालकमंत्र्यांनी सांगितले की,
कामे अंतिम टप्यात
बायपास मार्गावरील कामे अंतिम टप्यात आहेत रेल्वे ओव्हरब्रिज, लघुपूल आणि गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. प्रशासनाने या कामांना विशेष लक्ष देऊन गती वाढवल्याचे त्यांनी सांगितले . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या १७.७० किलोमीटरच्या बायपासमध्ये २५ नवीन कल्वर्ट्सपैकी २४ पूर्ण झाले आहेत, तर एक काम प्रगतीपथावर आहे. १० पैकी ९ लघुपूल पूर्ण झाले आहेत. ४ अंडरपासेसचे काम पूर्ण झाले असून, मोठ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन रेल्वे ओव्हरब्रिजपैकी एकाचे काम सुरू झाले असून, दुसऱ्याचे काम लवकरच सुरू होईल.