जळगावआरोग्यताज्या बातम्या

आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि सहकार्य वाढीवर भर

जळगाव जिल्हाधिकारी आणि आयएमए डॉक्टरांची बैठक

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन मेडिकल असोसिएशन (आय. एम. ए ), जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सरकारी व खासगी क्षेत्रातील डॉक्टरांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने ही बैठक झाली.

बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाला. यामध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध करून देणे, खासगी व सरकारी डॉक्टरांनी एकत्रित संशोधन करणे, तसेच रोग सर्वेक्षण यंत्रणा बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला.

याशिवाय, आरोग्य क्षेत्रातील संशोधन वाढवण्यासाठी खासगी व सरकारी डॉक्टरांनी एकत्रितपणे क्लिनिकल ट्रायल व आरोग्य संशोधन राबवावे, अशी संकल्पना मांडण्यात आली. रोग नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ओपीडी व फार्मसीमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या माहितीचा उपयोग करून आजारांचे ट्रेंड ओळखण्याची गरज अधोरेखित झाली. एम.आर. आय आणि सी. टी. स्कॅन सेवा चोवीस तास सुरू ठेवाव्यात, अशी डॉक्टरांनी मागणी केली.

अल्पवजनी बाळांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्यासाठी NICU मधून डिस्चार्ज झाल्यानंतर अशा बालकांची RBSK योजनेअंतर्गत नियमित तपासणी व देखरेख व्हावी, यावर भर देण्यात आला. बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन व MPCB प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. PCPNDT कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबवण्याचे सुचवण्यात आले. तसेच, विशेष गरजा असलेल्या बालकांची वेळेवर ओळख होऊन त्यांचा योग्य पाठपुरावा व्हावा यासाठी जिल्हा अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर (DEIC) चा अधिक परिणामकारक वापर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

याप्रसंगी “सरकारी व खासगी यंत्रणा एकत्र आल्यास जनतेला दर्जेदार, जलद आणि व्यापक आरोग्यसेवा देता येऊ शकते,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. या बैठकीतून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा विकास, सेवा गुणवत्तेत वाढ आणि संशोधनात्मक सहकार्याच्या नव्या दिशा निश्चित झाल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button