जळगावआर्थिकक्राईमताज्या बातम्याशासकीयसमस्या

सोनसाखळी चोरी प्रकरणी दोघे जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून दोन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले असून चोरीस गेलेल्या सोन्याचा मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या नगरतील एक महिला दुचाकीने घरी पोहोचत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पोबारा केला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दि. १६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी माहिती गोळा करून आरोपींची ओळख पटवली. 18 नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागात सापळा रचून पोलिसांनी तेजस अनिल ईखनकर (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली. त्याने चोरीत आपला साथीदार प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) सहभागी असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे, प्रसाद उर्फ परेश हा शनिपेठ पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यापासून फरार होता.

यादरम्यान पोलिसांनी 19 नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागातून प्रसाद उर्फ परेश संजय महाजन यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून चोरी केलेल्या मालामधून ८ ग्रॅम वजनाची, किंमत अंदाजे ८० हजार रुपये असलेली सोन्याची लगड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

यांनी केली कारवाई
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते), उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. ही संपूर्ण कारवाई एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउनि राहुल ताडे, पोउनि चंद्रकांत के., सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लावंजारी, पोह किरण पाटील ठाकूर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठी, पोकॉ चेतन पाटील यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button