आदिवासी भागात कार्यरत टी. बी. विभागातील कर्मचाऱ्यांना मिळणार आदिवासी भत्ता

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचा कर्मचारी हिताचा निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) : टी. बी. विभागांतर्गत आदिवासी भागात कार्यरत असलेल्या सहा कर्मचाऱ्यांचा दरमहा रुपये १५०० इतका आदिवासी भत्ता काही तांत्रिक कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आला होता. या परिस्थितीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही बाब जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ कर्मचारी हिताचा विचार करून बंद करण्यात आलेला आदिवासी भत्ता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना भत्ता देण्यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, “आदिवासी भागात कार्यरत कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत जनसेवा बजावत आहेत. त्यांच्या मनोबलात वाढ व्हावी आणि त्यांना योग्य आर्थिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
या निर्णयामुळे टी. बी. विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत



