मानाचा गणपती विसर्जन सोहळा जल्लोषात

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका प्रांगणातील मानाच्या गणपतीचे विसर्जन सोहळा आज भक्तिभावाने व उत्साहात प्रारंभ झाला. या सोहळ्यास आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते आरती करण्यात येऊन श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
जळगाव शहर स्वच्छतेच्या नव्या पर्वाकडे
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव महानगरपालिका आयुक्त धन्येश्वर धेरे व जळगाव शहर आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या भव्य स्वच्छता अभियानाचा शुभारंभ झाला. या उपक्रमात तब्बल १४३६ स्वयंसेवक सहभागी झाले असून, शहरातील ११ ठिकाणी कचरा संकलन करण्यात येणार आहे.
संकलित कचऱ्यातून खतनिर्मितीचे काम शिवाजी गार्डन येथे होणार आहे. अंदाजे १०० ते ११० टन कचरा आज या मोहिमेतून गोळा होण्याची अपेक्षा आहे. हा उपक्रम स्वच्छतेसाठी नागरिकांच्या सहभागाचे उत्तम उदाहरण ठरेल. आम्ही सर्व स्वयंसेवकांचे व आयोजक संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो.




