आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयसामाजिक

हैदराबादहून अंतराळ संशोधनासाठी बलून उड्डाणे

जळगाव जिल्ह्यांत उपकरणे पडण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत हैदाराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैद्राराबाद-५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून केली जाणार आहेत.

ही बलून उड्डाणे १९५९ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत असून, यंदाही त्याच परंपरेत प्रयोग पार पडतील. बलून हायड्रोजन वायूने भरलेली असून त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असतो. ही बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात आणि काही तासांच्या प्रयोगानंतर रंगीत पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरतात.

वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे हैदराबादपासून २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर पडू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपूर, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत उपकरणे उतरण्याची शक्यता आहे.

नागरिकांना विनंती करण्यात येते की, अशा उपकरणे किंवा पॅराशूट आढळल्यास ती उघडू किंवा हलवू नयेत. उपकरणांशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ शकते. काही उपकरणांवर उच्च विद्युत दाब (हाय व्होल्टेज) असू शकतो, त्यामुळे त्यांना हाताळू नये.

अशा वस्तू आढळल्यास जवळच्या पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, अथवा खालील पत्त्यावर फोन किंवा संदेश पाठवावा, संचालक, बलून सुविधा केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ईसीआयएल, हैदाराबाद. उपकरणांची सुरक्षित परतफेड करणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस व झालेला खर्च परत दिला जाईल. मात्र उपकरणांशी छेडछाड झाल्यास बक्षीस दिले जाणार नाही.

स्थानिक प्रशासनाने ही माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवावी व स्थानिक भाषेत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे, पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होणार असून, सर्व आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ईसीआयएल, हैदाराबाद यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button