स्वप्नपूर्ती टीमतर्फे आदिवासी पाडा दिवाळी फराळ व कपडे वाटप

रावेर (प्रतिनिधी) : “स्वप्नपूर्ती टीम” सावदा यांच्या पुढाकाराने रावेर तालुक्यातील पाल येथील आदिवासी पाड्यावर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पाड्यावरच्या बांधवांना दिवाळी फराळ व कपडे भेट देऊन आनंद आणि चैतन्याचा प्रकाश पसरविण्यात आला.
ही “स्वप्नपूर्ती टीम” ची पहिली सामाजिक सुरुवात ठरली असून, त्यासोबत बचतीचे महत्त्व व सरकारी योजनांचा लाभ या विषयांवर मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले. पालकांना “मुलांच्या शिक्षणासाठी बचत हीच खरी गुंतवणूक” या संकल्पनेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात एल.आय.सी. ऑफ इंडिया, सावदा शाखेचे उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि “स्वप्नपूर्ती टीम” चे संस्थापक चंदन महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी “स्वप्नपूर्ती टीम” चे परिश्रमी व समर्पित सदस्य अश्विन महाजन, सुनील तायडे, अतुल बखाल, शिवानंद राऊते यांनी विशेष मेहनत घेतली.




