धामोडी रस्त्यावर वाकलेल्या विजेच्या खांबाबाबत महावितरणला निवेदन

तातडीने कार्यवाहीची मागणी, अन्यथा दिला आंदोलनाचा इशारा
धामोडी (प्रतिनिधी) : धामोडी गावाच्या मुख्य रस्त्यावर वीज वितरण कंपनीचा एक विजेचा खांब धोकादायक स्वरूपात वाकलेला असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग रावेर यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
धामोडी रस्त्यावर असलेला हा खांब काही दिवसांपासून झुकलेला असून त्यावरून जाणाऱ्या विजेच्या ताराही झुकलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक, पादचारी तसेच शाळकरी मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत जोरदार वाऱ्यामुळे हा खांब कोसळण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात अनेक वेळा तोंडी तक्रारी करण्यात आल्या तसेच वृत्तपत्रात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. तरीदेखील महावितरण विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. “दुर्घटना घडल्यास याची पूर्ण जबाबदारी वीज वितरण कंपनीवर राहील,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, तातडीने या धोकादायक खांबाची दुरुस्ती अथवा नवीन खांब बसवावा. अन्यथा महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते दिपक रत्नपारखे व रविंद्र मेढे उपस्थित होते. त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.




