
लोणवाडी गावातील घटना; तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून तालुक्यातील लोणवाडी येथे पिता-पुत्राला शिवीगाळ करीत चापट्या-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना रविवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी लोणवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. या घटनेमध्ये मिलींद धाडी आणि त्यांचे वडील धाडी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलींद हिरालाल धाडी (वय २२, रा. लोणवाडी ता.जळगाव) हे रविवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आपल्या शेतात जात असताना त्यांना लोणवाडी ग्रामपंचायतीसमोर विक्रम साहेबराव चव्हाण, दशरथ साहेबराव चव्हाण आणि हेमराज साहेबराव चव्हाण या तिघांनी अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून मिलींद धाडी यांना चापट्या-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हिरालाल धाडी हे भांडण सोडवण्यासाठी आले असता विक्रम चव्हाण याने जमिनीवर पडलेला दगड उचलूनत्यांच्या यांच्या डोक्यात मारला.
दरम्यान, इतर दोन संशयित आरोपी दशरथ चव्हाण आणि हेमराज चव्हाण यांनीही दगडफेक करत पिता-पुत्रांना शिवीगाळ केली. त्यांनी दोघांना गावात राहू देणार नाही असा दम दिला. या घटनेनंतर घाबरलेल्या पिता-पुत्रांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवार, ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत.




