बायपास बंदमुळे शहरातील वाहतूक कोंडी गंभीर; तीन नागरिकांच्या मृत्यूनंतर NHAI अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

खोटेनगर ते बांभोरी मार्गावर वारंवार वाहतूक ठप्प; अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरालगतचा बायपास मागील सुमारे महिनाभरापासून बंद असल्याने शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून, या कालावधीत झालेल्या प्राणघातक अपघातांमध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर NHAIच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोष आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बायपास बंद असल्यामुळे अवजड वाहने शहरातून जात असल्याने वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः खोटेनगर ते बांभोरी या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. काल सायंकाळीदेखील या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाल्याचे सांगण्यात आले.
तीन नागरिकांचा मृत्यू
बायपास बंद झाल्यानंतर निर्माण झालेल्या वाहतूक परिस्थितीत विविध ठिकाणी अपघात घडले असून, त्यामध्ये आतापर्यंत तीन नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका याबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
या परिस्थितीकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष असतानाही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
NHAIच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
बायपास बंद ठेवण्यामागील कारणे, त्याची सद्यस्थिती, पर्यायी वाहतूक व्यवस्था तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बायपास बंद असल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत संबंधित यंत्रणेकडून निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर झाल्याचे चौकशीत आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून भारतीय न्याय संहिता आणि अन्य लागू कायद्यांनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आणखी जीवितहानी होण्यापूर्वी उपाययोजना करा
तीन नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही परिस्थिती कायम राहणे चिंताजनक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आणखी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने वाहतूक नियोजन करावे, अवजड वाहनांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी आणि वाहतूक पोलिसांची प्रभावी नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



