गणेशोत्सव मंडळाला मिळणार ५ लाखाचे प्रथम पारितोषिक

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा
जळगाव (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या मंडळास तब्बल ₹५ लाखांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी राज्यभरातील नोंदणीकृत किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. २० जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. स्पर्धा पूर्णतः निःशुल्क आहे. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
या निकषांवर होणार परीक्षण
या स्पर्धेत मंडळांनी राबवलेले सांस्कृतिक उपक्रम, पर्यावरणपूरक सजावट व मूर्ती, सामाजिक जनजागृती कार्यक्रम, ध्वनीप्रदूषणविरोधी उपाययोजना, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे संवर्धन इत्यादी विविध निकषांवर परीक्षण केले जाणार आहे.
गणेशोत्सव काळात, २७ ऑगस्टपासून, जिल्हाधिकारी कार्यालयांनी नियुक्त केलेल्या समित्यांमार्फत जिल्हास्तरावरील परीक्षण करण्यात येईल. मुंबई, उपनगर, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ तर उर्वरित ३२ जिल्ह्यांतून प्रत्येकी १ अशा एकूण ४४ मंडळांची शिफारस राज्यस्तरीय परीक्षणासाठी केली जाईल.
असे आहेत पारितोषिके
राज्यस्तरावरील अंतिम विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत. यात प्रथम क्रमांक – ₹५,००,००० व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – ₹२,५०,००० व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक – ₹१,००,००० व प्रमाणपत्र, इतर जिल्हास्तरीय विजेते – ₹२५,००० व प्रमाणपत्र.
या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती व अर्जाची लिंक संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमध्येही उपलब्ध आहे.