सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 11 कोटींचा परतावा

जळगाव (प्रतिनिधी) : महावितरणकडे जमा असलेल्या वीजबिलांच्या सुरक्षा ठेवीवर जळगाव परिमंडलातील 11 लाख 50 हजार 996 लघुदाब वीजग्राहकांना 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 11 कोटी 6 लाख रुपये व्याज देण्यात आले आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे.
जळगाव मंडलातील 7 लाख 20 हजार 747 ग्राहकांना 6 कोटी 73 लाख रुपये, धुळे मंडलातील 3 लाख 8 हजार 994 ग्राहकांना 3 कोटी 6 लाख रुपये तर नंदुरबार मंडलातील 1 लाख 21 हजार 255 ग्राहकांना 1 कोटी 27 लाख रुपये व्याज देण्यात आले आहे. सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतली जाते? त्यावर व्याज मिळते का? असे एक नाही तर असंख्य प्रश्न सामान्य वीजग्राहकाला नेहमीच पडत असतात. मुळात महिनाभर वीज वापरल्यानंतर ग्राहकांना महावितरण वीजबिल देते. ते भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत देते. मुदत संपल्यानंतरही बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासाठी 15 दिवसांची नोटीस देते. हा सर्व कालावधी दोन महिन्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार हमी म्हणून ग्राहकांकडून मागील वार्षिक वीजवापराच्या सरासरी दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
महावितरण वर्षातून एकदा वीजवापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निर्धारण करू शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील दोन महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फरकाच्या रकमेचे बिल म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल जाते. ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा महावितरणकडे भरणा केला नसेल त्यांची ती थकबाकी सुरक्षा ठेवीतील व्याजामधून वळती करण्यात येते. ग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्याचेही विद्युत नियामक आयोगाचे निर्देश आहेत.
महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करताना ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केली जाते. यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.