जळगावआरोग्यसामाजिक

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती

जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (युनिट) च्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश वाढती लोकसंख्या, तिचे आरोग्य व पर्यावरणावर होणारे परिणाम आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेले उपाय याविषयी जनजागृती करणे हा होता.

कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी फाउंडेशनद्वारे संचालित आणि एमयुएचएस नाशिकशी संलग्न असलेल्या नॅक मान्यताप्राप्त गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये त्यांनी लोकसंख्येच्या सध्याच्या स्थितीबाबत विवेचन करताना संतुलित लोकसंख्येचे आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक विकासावर होणारे सकारात्मक परिणाम अधोरेखित केले. यानंतर दोन प्रमुख उपक्रम राबवण्यात आले. आरोग्य जनजागृती सत्र आणि निबंध लेखन स्पर्धा, आरोग्य जनजागृती सत्रात रासेयो स्वयंसेवकांनी कुटुंब नियोजन, प्रजनन आरोग्य, मातृ व बालकल्याण आणि जनसंख्या नियंत्रणाच्या उपाययोजनांवर सखोल माहिती दिली.

विविध स्पर्धाचे आयोजन
सत्रात पोस्टर प्रदर्शन, चार्ट्स, माहितीपर व्याख्याने आणि संवादात्मक चर्चांद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधण्यात आले. विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी साक्षरता व माहितीची भूमिका स्पष्ट करण्यात आली. स्वयंसेवकांनी आरोग्य आणि लोकसंख्येचा परस्पर संबंध प्रभावीपणे मांडला. निबंध लेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लोकसंख्या वाढ आणि शाश्वत विकास तसेच युवावर्गाची भूमिका लोकसंख्या नियंत्रणात या विषयांवर लेखन केले. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळाली आणि लोकसंख्या विषयक समज विस्तृत करण्यास प्रोत्साहन मिळाले. काही उत्कृष्ट निबंध निवडून त्यांचे वाचनही करण्यात आले.

या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना रुजली आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्य विषयक मुद्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.रासेयोचे मी नाही तुम्ही या ब्रीदवाक्याशी सुसंगत अशी सामूहिक जबाबदारीची भावना यामध्ये दिसून आली. जागतिक लोकसंख्या दिनाचे हे आयोजन हे एक यशस्वी, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी पाऊल ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button