
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लसतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
जळगाव, (प्रतिनिधी) : वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस ही संस्था कष्टकरी महिला आणि त्यांच्या पाल्यांसाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. या संस्थेच्या कार्याची दखल घेत आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. शाळा लांब असलेल्या आणि गरजू विद्यार्थिनींना सुलभ शिक्षणासाठी सायकल पुरविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रविवारी वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. आधार जेष्ठ नागरिक संघ यांच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ५०० विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी, जैन ब्रदर्स तर्फे पी.एस. नाईक, मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त उदय पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी, आधार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संभाजीराव देसाई आणि अध्यक्षस्थानी आमदार राजुमामा भोळे उपस्थित होते.
यावेळी आमदार राजूमामा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी खूप शिकले पाहिजे आणि चांगले संस्कार घेतले पाहिजेत. आई-वडील, शाळा, शहर, राज्य आणि देशाचे नाव उज्वल करण्याचे कार्य त्यांनी केले पाहिजे. मी नेहमी तुमच्यासोबत आहे, तुम्ही केव्हाही माझ्याकडे येऊ शकता, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा शांता वाणी यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय देत जैन ब्रदर्स तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुरविल्याबद्दल अशोक जैन यांचे आभार मानले. तसेच संस्थेचा उद्देश केवळ शैक्षणिक मदत न करता चांगले संस्कारयुक्त नागरिक घडविण्याचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन हेमलता कुलकर्णी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय अर्चना पाटे यांनी करून दिला. शालिनी चौधरी यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सरला सूर्यवंशी, तनुजा चोपडे, श्यामल शिंदे, छाया पाटील, ज्योती दातेराव, सुनीता महाजन, चंद्रकला पाटील, संगीता पाटील, भारती पाटील, पूजा पंडित, कामिनी पांडे, वंदना पांडे, रुपाली पवार, प्रणाली नेवे, साक्षी सूर्यवंशी, नीता गुरव, समाधान पवार तसेच जेष्ठ नागरिक सभासद यांनी परिश्रम घेतले.