जागतिक एड्स दिनानिमित्त जळगावमध्ये विविध कार्यक्रम

पथनाट्याव्दारे जनजागृती; रॅलीने वेधले लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात एड्स नियंत्रणाविषयी जनजागृती विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर समाजातील भेदभाव दूर करण्याचा संदेश देत सर्वांनी जागतिक एड्स दिनानिमित्त जबाबदारीने वागण्याची शपथही घेतली.
या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, आरटी सेंटरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जावळे तसेच विद्यार्थी, डॉक्टर्स आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एड्स नियंत्रणासाठी उपलब्ध सुविधा, गोपनीय चाचण्या, उपचार आणि सल्ला केंद्रांची माहिती देत नागरिकांना सावध तसेच संवेदनशील राहण्याचे आवाहन केले.
यानंतर शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात फलक, घोषवाक्ये आणि माहितीपूर्ण संदेश घेऊन विद्यार्थ्यांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी काढलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. “एड्सवर मात- जागरूकता हीच साथ”, “भेदभाव नाही, समज आवश्यक” अशा घोषणांनी रॅलीच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेमध्ये सकारात्मक विचारांचे संचार झाले. दिनानिमित्त जबाबदारीने वागण्याची शपथही घेतली.




