
शनिपेठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील घेतले ताब्यात, ६ लाख ६० हजाराचा सोन्याचा ऐवज जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : दोन मोठ्या शहरातील सोन्याच्या दुकानात हुशारीने अंगठ्या चोरून नकली अंगठ्या ठेवून फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शनिपेठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथून ताब्यात घेतले. या कारवाईत महिलेकडून सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा चोरीचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये ४ नोव्हेंबर रोजी आर. सी. बाफना ज्वेलर्स (सुभाष चौक) येथील मॅनेजर गणेश राजाराम काळे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल होता. अनोळखी महिलेने हातचलाखीने तीन सोन्याच्या अंगठ्या लंपास करून त्याऐवजी नकली अंगठ्या ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. याच महिलेने जळगावमध्ये जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पु.ना. गाडगीळ अॅण्ड सन्स (रिंग रोड) आणि छत्रपती संभाजी नगर येथील जिन्सी पोलीस स्टेशन हद्दीतील आर.सी. बाफना ज्वेलर्समध्येही अशाच प्रकारची चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि साजीद मन्सुरी आणि पोउपनि योगेश ढीकले यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासी अंमलदार पोहेकों. प्रदीप नन्नवरे यांच्या पथकाने बरेली (उत्तर प्रदेश) येथे धाव घेत लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक या महिलेस ताब्यात घेतले, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक नितीन गणापूरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
तिच्याकडून वरील तिन्ही गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल म्हणजेच ६ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या ६ नगांच्या ६१.६७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. तांत्रिक विश्लेषणासाठी नेत्रम विभागाचे पंकज खडसे, मुबारक तडवी, कुंदसिंग बयस, मिलींद जाधव आणि गौरव पाटील यांचे सहकार्य लाभले. आरोपी महिलेस शनिपेठ पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.




