
१३४ गुन्हे नोंद, १४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. शासनाच्या “शून्य सहनशीलता धोरणा”नुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशावरून आणि पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
९ जुलै रोजी एकाच दिवशी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोलिस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या धाडसत्र राबवले. या धाडसत्रादरम्यान एकूण १३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात दारू, कच्चे रसायन आणि एक वाहन जप्त करण्यात आले.
ही कारवाई अत्यंत ठोस आणि प्रभावी ठरली. या मोहिमेमध्ये एकूण ३३८५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २०१५० लिटर रसायन (कच्चा माल) आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ₹१४,४८,६६२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संयुक्त कारवाईत पोलिस विभागाने ९९ गुन्ह्यांची नोंद केली असून, २८४५ लिटर दारू आणि ५६३० लिटर रसायन जप्त केले. या कारवाईची अंदाजित किंमत ₹६,१२,३८२ इतकी आहे. त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३५ गुन्ह्यांची नोंद घेतली असून, त्यांच्या कारवाईत ५४० लिटर दारू, १४५२० लिटर रसायन आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत ₹८,३६,२८० इतकी आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर रोख बसवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आघात करणारे ठरणार आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही अवैध दारू उत्पादन, विक्री किंवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर माहिती द्यावी. नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.