अभिवादनआरोग्यकलाकारजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारशैक्षणिकसामाजिक

पु.ना.गाडगीळ कला दालनात ३० नोव्हेंबर पर्यंत कलाकृतींचे प्रदर्शन

जिद्दीने घडवलेले रंगविश्व : ज्योती बिंद हिचा प्रेरणादायी प्रवास

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील मक्तेदार घनश्याम बिंद यांची कन्या, केवळ वयाच्या वीसाव्या वर्षी स्वतःचे स्वतंत्र ओळखविश्व निर्माण करणारी ज्योती घनश्याम बिंद. खोटेनगरातील साध्यासुध्या वातावरणात वाढलेली ही तरुणी आज आपल्या कलाकृतींच्या तेजाने संपूर्ण परिसर उजळवत आहे. पु.ना.गाडगीळ कला दालनात ३० नोव्हेंबरपर्यंत ज्योतीच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले असून जळगावकरांनी एकदा भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ज्योती शालेय जीवनात असतानाच चित्रकलेची ओढ तिच्या मनात रुंजी घालत होती. परंतु २०२० मधील लॉकडाऊनने तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण दिले. शाळा बंद, अभ्यास ठप्प, आणि जग थांबले असताना ज्योतीने मात्र रिकामेपणाला रंगांच्या उधळणीत रूपांतरित करण्याचा निर्धार केला. ब्रश हातात घेताच तिच्या भावविश्वाला नवी दिशा मिळाली. पाहता पाहता ही आवड केवळ छंद न राहता तिचे ध्येय बनली.

कुटुंब, समाजाचा विरोध मात्र जिद्द कायम
घरच्यांचा विरोध, समाजातील मर्यादा आणि भोवतालातील नकारात्मकता हे सगळं तिच्या वाटेत काटेरी अडथळ्यांसारखे उभे राहिले. तरीही तिने कलेला आपल्या जीवनस्वप्नासारखे जपले. मू. जे. महाविद्यालयात ११ वी कला शाखेत प्रवेश घेतला, पण निरुत्साही वातावरणामुळे तिच्या वाटचालीला पुन्हा विराम मिळत असल्याचं तिला जाणवले.

पुन्हा बहरले सप्तरंगी आयुष्य
१२ वीला असताना तिच्या आयुष्यात कला शिक्षक तरुण भाटे आले. त्यांनी केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर कलेतूनही उज्ज्वल करिअर उभारता येते हे सर्वांना पटवून दिले. त्यांच्या प्रेरणेने आणि योग्य माहितीमुळे ज्योतीच्या कुटुंबियांचाही दृष्टिकोन बदलला. वडिल तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि ज्योतीच्या आयुष्यातील रंग पुन्हा उजळू लागले.

आज कलाक्षेत्र हेच जीवन
१२ वी नंतर ज्योतीने ओजस्विनी कला महाविद्यालयातून कला शिक्षक डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर तिच्या कलात्मक प्रवासाला खऱ्या अर्थाने भरारी मिळाली. आज ती अॅक्रिलिक, वॉटरकलर, स्केचिंग, अॅब्स्ट्रॅक्ट, पोर्ट्रेट, स्टेक्चर आर्ट, ऑइल पेंटिंग, वॉल पेंटिंग अशा सर्व प्रकारच्या चित्रकलेत समर्थपणे कलाकृती साकारते. तिच्या हातून रंगांना जीव मिळतो, आणि भावनांना आकार!

स्वप्ने सोडू नका, कलेची जोपासना करा
“कला क्षेत्रात पाऊल टाकले म्हणजे भविष्य नाही, हा गैरसमज समाजात खोलवर रुजलेला आहे. परंतु आवडीच्या क्षेत्रात काम केलं, तर यश मिळतंच. बोलणारे बोलत राहतील, पण आपले स्वप्न, आपली कला आणि आपला आत्मविश्वास कधीच सोडू नका. मुली सर्व काही करू शकतात आणि त्यांनी करायलाच हवं. ज्या लोकांनी सुरुवातीला विरोध केला, तेच आज माझ्या कलेची प्रशंसा करतात.”, असे ज्योती हिने सांगितले आहे.

कलाकृतींचे प्रदर्शन, भेट देण्याचे आवाहन
ज्योती बिंद हिचा हा प्रवास आवड, जिद्द आणि चिकाटीने स्वप्नांना रंग देणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीसाठी एक प्रेरणादायी कथा आहे. ज्योती हिने साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन पु.ना.गाडगीळ कला दालनात ३० नोव्हेंबरपर्यंत भरवण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ५ अशी प्रदर्शनाची वेळ असून कलाप्रेमी आणि जळगावकरांनी एकदा भेट देण्याचे आवाहन ज्योती बिंद हिने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button