दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांच्या खंद्या समर्थक दिक्षा दिंडे रविवारी जळगावात

रेडक्रॉसतर्फे हृदय संवादाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांच्या खंद्या समर्थक दिक्षा दिंडे या रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जळगावात येत आहे. रेडक्रॉस भवन येथे रेडक्रॉसतर्फे त्यांच्या हृदय संवादाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या प्रेरणा हृदय संवादाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन रेडक्रॉस कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीलचेअर गर्ल म्हणून ओळख
दिव्यांग व्यक्ती आपल्या समाजाचा एक अभिन्न भाग असून दिव्यांगता हे असमर्थता किंवा दुर्बलतेचे लक्षण नाही, तर ते एक अद्वितीय सामर्थ्य आहे. काही दिव्यांग व्यक्ती आपल्या दिव्यांगत्वावर मात करीत जिद्दीने जगाला उमेदीने जगण्याची नवी दिशा दाखवितात. अशीच एक व्हीलचेअर गर्ल म्हणून ओळखली जाणारी, जगभरात ‘मोटीवेशनल स्पीकर’ म्हणून प्रसिद्ध असणारी व दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभता, शिक्षण आणि समान संधी सुनिश्चित करण्यासाठी कार्य करणारी संयुक्त राष्ट्र संघाची ‘ग्लोबल युथ अँबेसिटर असलेली अवलिया दिक्षा दिंडे जळगावला येत आहे.
‘इनक्लुजन यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याची जिल्ह्यापासून होणार सुरुवात
दिव्यांगांच्या समानसंधी, स्वावलंबन आणि सुलभता या विषयावर जागरूकता करण्याच्या उद्देश्याने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात “इनक्लुजन यात्रा” करीत असून या यात्रेच्या ६० दिवसीय २२ जिल्ह्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यापासून होत आहे. असंख्य समस्यांना तोंड देऊन “हौसले बुलंद हो, तो मंजिले दूर नही होती” हे वाक्य जगणारी आणि जगविणारी दिक्षा दिंडे हिच्या समवेत हृद्य संवादाचे आयोजन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता रेडक्रॉस भवन येथे करण्यात आले आहे.




