
जळगाव (प्रतिनिधी) : प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहारात भरड धान्याच्या पदार्थांचा समावेश करावा असे आवाहन डॉ. दर्शना शाह यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटतर्फे मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष संदीप झंवर, सहसचिव धर्मेश भैय्या यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानात डॉ. शाह यांनी भरड धान्य सेवनाचे फायदे आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थांमुळे होणारे नुकसान याबद्दल माहिती देऊन खाद्य पदार्थांच्या पैकेटवरील घटक आणि कॅलरी माहिती काळजीपूर्वक वाचण्याचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाला शक्य तितक्या पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळण्याचे त्यांनी आवाहन केले. पॉवरपॉईंट सादरीकरण करीत डॉ. शाह यांनी भरड धान्याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
रोटरी इलाईट क्लब तर्फे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी खाण्याच्या सवयी आणि भरड धान्याचे फायदे याबद्दल जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये अभियान आयोजित करण्याचा मानस अध्यक्ष संदीप झंवर यांनी व्यक्त केला. परिचय नितेश पाटील यांनी तर आभार दिनेश तिवारी यांनी मानले.




