कांडवेल, धामोडी ते अजंदा रोडवरील साईड पट्ट्यांवरील वाढलेल्या झाडांमुळे नागरिक त्रस्त; अपघातांचा धोका वाढला

धामोडी, ता.रावेर (प्रतिनिधी) : कांडवेल, धामोडी ते अजंदा या मुख्य मार्गावरील दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे आणि गवत वाढल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील दृष्टीक्षेप कमी झाल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी वाहतुकीत धोका वाढत असून अपघातांचा गंभीर अंदाज व्यक्त केला जात आहे.
या परिस्थितीबाबत दोन महिन्यांपूर्वीही वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र आजतागायत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.
वाहनधारकांचे म्हणणे आहे की, वाढलेल्या झाडांमुळे रस्ता अरुंद दिसतो, ओव्हरटेकिंग करताना दुसरे वाहन समोरून येत असल्याचे दिसत नाही. परिणामी धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते दिपक जैन, रविंद्र मेढे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, रावेर येथे लेखी निवेदनाद्वारे तातडीची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात साईड पट्ट्यांवरील झाडे, झुडपे व गवत तात्काळ हटवून मार्ग स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून तत्काळ दखल घेऊन नागरिकांची वाहतूक सुरक्षित करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




